करियर म्हणजे काय?
मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या मराठी नोकरी व करियर विषयी माहिती देणाऱ्या ब्लॉग वर. आज आपण जानुन घेणार आहोत ते करियर विषयी. आजकाल आपल्याला करियर विषयी सोशल मीडियावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. आपण ती घेऊच पण तत्पूर्वी आपण करियर या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण करियर हा विषय ज्यावेळी कोणत्याही युवक-युवतींसमोर किंवा त्यांच्या पालकांसमोर येतो त्यावेळी खूप साऱ्या संभ्रमांना सामोरं जाव लागत. या लेखात आपण याच गोष्टींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. जस की करियर म्हणजे काय? आजच्या संगणक युगातील ग्रामीण तसेच शहरी युवक-युवतींना सहज त्यांच्या हातात करियर संबंधी माहिती उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनण्यासाठी, त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्गाला छोटासा हातभार लावावा म्हणूनच आजचा हा लेख तरुणांसाठी.
करियर म्हणजे काय?
आजकाल 10 वी – 12 वी ला असणाऱ्या मुला-मुलींना व त्यांच्या पालकांना भविष्याची चिंता सतावते म्हणजेच त्यांचे करियर काय असावे? पण त्यापूर्वी आपण आजच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक गोष्ट लक्षात घेऊयात ती म्हणजे विद्यार्थ्यांच होणार मूल्यांकन हे त्यांनी मिळवलेल्या गुणांवर अवलंबून असते. जे विद्यार्थी वर्षभर चांगला अभ्यास करतात त्यांना टक्केवारी चांगली मिळते आणि जे विद्यार्थी अभ्यासात जेमतेम असतात त्यांना टक्केवारी कमी मिळते. आणि त्यानंतर एकंदरीत परिस्थिती, ही मुलं आणि पालकांची सत्वपरीक्षा पाहणारी. उत्तम गुण मिळवणारे विद्यार्थीच या स्पर्धेच्या प्रचंड रेटारेटीत आवश्यक त्या दालना पर्यंत पोहोचू शकतात. सध्या पेपर फुटी व कॉपीचे प्रमाण वाढले तसेच काही गुण हे ज्या-त्या शिक्षण संस्थांकडे असल्यामुळे व शिक्षण संस्था राज्यकर्त्यांच्या व कारखानदार यांच्या अधिपत्याखाली गेल्यामुळे तेथे फक्त श्रीमंतांनाच फायदा मिळतो. अशा अवस्थेत गरीब व मध्यम वर्गीयांची होणारी दुर्बलता शिक्षणाचा दर्जा खालावण्यास भाग पाडते. अशा विद्यार्थ्यांची व पालकांची स्थिती कमी गुण मिळाल्याने मोठी विचित्र होते. अनेकदा आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता, आपल्या मुलाचा कल कोठे आहे, किंवा त्याची कुवत काय आहे, याबाबत मात्र कोणीही पालक गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. याची अनेक उदाहरण दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात.राजस्थानातील कोटा येथे प्रवेश परीक्षेसाठी शिकवणी वर्गाला म्हणून राहिलेल्या अठरा वर्षाच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोटा हे शहर राजस्थानमध्ये असले तरी ही मुलगी मात्र होती उत्तर प्रदेशातली. आपल्या मुलीला डॉक्टर करायचेच या उद्देशाने तिच्या पालकांनी तिला तिच्या मनाच्या विरुध्द कोटा येथे शिकवणीसाठी पाठवले होते, या मुलीने आत्महत्या केली. असाच एक प्रकार मराठवाड्यात घडला. लातूर येथील एक मुलगी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला तिच्या मर्जीविरुध्द या विद्यालयात घातलेले होते. पण तिला जायचे होते ते लष्करात किंवा पोलिसात. ही कल्पना तिच्या पालकांना मान्य नव्हती. त्यामुळे तिला नाईलाजाने अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकावे लागत होते. शेवटी तिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. त्यात अजून अठरा वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आईवडिलांची माफी मागितली आहे आणि आपण उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पात्र ठरलो नाही तर आईवडिलांना तोंड दाखवू शकणार नाही म्हणून आपण आत्महत्या करत आहोत असे म्हटले आहे. भारताच्या सर्वच भागांतून आशा प्रकारच्या बातम्या नेहमीच कानावर येतात. अशातच ‘3 इडियट’ या चित्रपटातील एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो, की पालकांच्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थी त्यांनी सांगितलेला मार्ग निवडतात पण त्यात यशस्वी न झाल्याने स्वतः च जीवन संपवतात.
एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किती हुशार असावी याचे एक माप ठरलेले असते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याची कुवत साठ टक्के गुण मिळवण्याची असते त्याला प्रयत्नाने फार तर पासष्ट टक्के किंवा सत्तर टक्के गुण मिळू शकतात. परंतु पालकांची धारणा अशी होते की आपण ज्या अर्थी मुलावर वर्षाला शिकवण्या लावून चार ते पाच लाख रुपये खर्च करत आहोत त्या अर्थी या मुलाला नव्वद – पंच्यांनव टक्के गुण मिळालेच पाहिजेत. असे पालक मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याच्या कल्पनेने इतके झपाटलेले असतात की त्यांना हे लक्षात येत नाही की मुलाला किती मार्क मिळावेत हे त्याच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असते. त्याच्यावर तुम्ही किती खर्च करता यावर ते अवलंबून नसते. त्यामुळे अशा विचित्र कल्पनापोटी ते मुलांकडून नको त्या अपेक्षा करत बसतात आणि मुलाला आपल्या महत्त्वाकांक्षेपोटी मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीत ढकलतात. तिथे यश आले नाही की मुले निराश होतात आणि अशा निराश झालेल्या मुलांपैकी अधिक संवेदनशील मुले आत्महत्या करून आईवडिलांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात.
मुलांच्या मनावर नको तेवढे अपेक्षांचे ओझे टाकणार्या पालकांची मनोवृत्तीही बदलणे आवश्यक ठरले आहे. आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे असे वाटण्यात गैर काही नाही. तसा प्रयत्न करायलाही काही हरकत नाही. परंतु आपल्या कल्पनेप्रमाणे तो डॉक्टर होऊ शकत नसेल तर त्याच्या आणि आपल्या आयुष्यात काही अर्थ राहणार नाही असे मानणे मात्र चुकीचे आहे. किंबहुना ही एक विकृतीच आहे. जगामध्ये इंजिनिअर, डॉक्टर हीच क्षेत्रे नाहीत आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर होणे म्हणजेच जीवनाचे सार्थक नव्हे. इतर अनेक गोष्टी करूनसुध्दा मुले चांगला पैसा कमवू शकतात. किंबहुना निव्वळ पैसे कमवण्याला तरी जास्त महत्त्व का द्यावे हाही प्रश्न आहे. काही मुलांना थोडे कमी पैसे मिळाले तरी चालतील परंतु त्याला समाधान मिळाले पाहिजे आणि विशेषतः तो मनाने सुखी झाला पाहिजे. याकडे पालकांनी लक्ष दिले गेले पाहिजे. म्हणून मुलांचा अभ्यासक्रम निवडताना त्याला ज्या अभ्यासक्रमात आनंद लुटता येईल तो अभ्यासक्रम निवडला पाहिजे. शिवाय जास्त पैसे मिळवणे म्हणजे सुखी होणे ही सुखाची व्याख्याही बदलली पाहिजे. गडगंज पैसा मिळवणार्या अनेक लोकांपेक्षा मर्यादित पैसे मिळवणारे अनेक लोक सुखी असतात. कारण सुख हा पैशाचा विषय नसून मनाचा विषय आहे.
जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला एक स्वतंत्र देणगी मिळालेली असते. कोणाच्या तरी हातून सुंदर चित्र साकारते. एखाद्याची कविता चार ओळीत खूप मोठा अर्थ सांगून जाते. एखाद्या मुलीचे नृत्य देहभान विसरायला लावते. सतारीच्या तारा छेडत असताना कुणाच्यातरी बोटात वीज उतरते, कोणाचा आवाज मंत्रमुग्ध करणार असतो. प्रत्येक व्यक्तिची प्रतिभा स्वतंत्र असते. प्रत्येकाकडे एक स्वतंत्र कौशल्य हातोटी व कला असते. परंतू आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करीत असतो. जसे झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल, हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व स्वधर्माकडे दुर्लक्ष करू नये. आजकालच्या सर्व तरुणांना डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर घडवणे असे वाटते. पण यामुळे समाजाच्या गरजांची पूर्तता होणार आहे काय?
या अनुषंगाने येथे एक गोष्ट सांगविशी वाटते -
एका राजाची गोष्ट.. त्याला काही अधिकारी नेमण्याचे होते त्याने गावात दवंडी दिली. आलेल्या तरुणातून शारीरिक चाचणी घेऊन त्याने चार तरुण निवडले. प्रधानजी ना वाटत होतं की या मंडळींना राजाने लगेचच नोकरीवर घ्यावे. पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला त्या चौघांची परीक्षा घ्यावयाची होती. राजाने आदेश दिला या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठडीत बंदिस्त करून ठेवा आणि त्यांना चार दिवस उपाशी ठेवा. त्याप्रमाणे प्रधानाने केले. चार दिवसानंतर राजाने पुन्हा आदेश दिला. आता चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा. राजाची आज्ञा पाळून सर्वजण या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत जेवणाचे ताट आणि कुत्रे घेऊन येताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट त्या कुत्र्यापुढे ठेवले. आणि तो देवाची प्रार्थना करू लागला. राजा म्हणाला याला आपल्या अध्यात्म व धार्मिक विभागात घ्या. हा त्यासाठी योग्य आहे. दुसऱ्या खोलीतील दृश्य मजेशीर होते. तो तरुण ताटातले अन्न स्वतः खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला याला अर्थव्यवहार विभागाकडे खजिनदारपदी घ्या. हा स्वतः ही पैसा खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही. तिसऱ्या खोलीत वेगळेच दृष्य होते. तिथला तरुण थोडीशी पोळी कुत्र्याकडे टाकत होता, आणि कुत्रे खाण्यात दंग असताना तो स्वतः खाऊन घेत होता. राजा म्हणाला याला आपल्या पाकखान्यात घ्या. हा स्वतःही खाईल आणि इतरांनाही चांगले खाऊ घालेल. चौथ्या खोलीत विलक्षण दृष्य दिसले. तो तरुण अक्षरश: कुत्र्याच्या मानगुटीवर बसून जेवण करत होता. राजा म्हणाला, याला आपल्या संरक्षण विभागाचा प्रमुख करा. हा त्यासाठी योग्य आहे. राजाची कल जाणून घेण्याची पद्धत अजब जरी असली, तरी त्याने योग्य तेच निर्णय घेतले.म्हणूनच करियर ची व्याख्या -
अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते.आज पालक आपल्या मुलांना नेहमी सांगतात की, तू आमक्या सारखा हो. तू तमक्या सारखा हो. पण तुझ्या कर्तृत्वाने, रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी भरलेले तुझे व्यक्तिमत्व तू निर्माण कर ते आम्हाला अपेक्षित आहे. असा आग्रह पालकांनी धरायला हवा. या संदर्भातले लोकमान्य टिळकांचे उदाहरण महत्त्वाचे वाटते. तुरुंगातून आपल्या चिरंजीवांना पाठवलेल्या पत्रात लोकमान्य लिहितात, 'आयुष्यात आपण कोण व्हायचे, काय व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी तुम्हालाच आहे. अगदी चप्पल बांधणाऱ्या चर्मकाराचा जरी व्यवसाय करावासा वाटला, तरी मला दुःख वाटणार नाही. पण तो तुम्ही इतक्या उत्तम रीतीने करा, की लोकांनी म्हणावे, चपला घ्यावा तर टिळकांकडूनच.
एका सनई वादकाने आपल्या मुलाला सनई शिकवण्याचा खूप प्रयत्न केला. उद्देश हाच की, आपल्यानंतर यानी आपली पारंपारिक कला जोपासली पाहिजे. परंतु मुलगा काही केल्या ऐकेना. एके दिवशी बापाने मुलाला जबरदस्तीने आडवे पाडले व त्याच्या तोंडात सनई घातली. आणि रागाने शिकण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा मुलगा म्हणाला, "शेवटी फुंकायचे माझ्याच हातात आहे ना!" अयोग्य ठिकाणी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरतात. बगळा पांढरा आहे म्हणून त्याला पोपटा प्रमाणे बोलायला शिकविणे व्यर्थ आहे.